अमरावती शहरात लटकलेले फाइबर केबल्स अपघातांना आमंत्रण; नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

अमरावती शहरातील रस्ते, चौक आणि वस्ती भागांमध्ये ठिकठिकाणी लटकलेले फाइबर व केबल्स आता थेट अपघातांना आमंत्रण देत आहेत. शहराच्या सौंदर्यावर यामुळे डाग तर बसलाच आहे, पण नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेचे होत असलेले दुर्लक्ष अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
शहरात जिकडे नजर टाकावी तिकडे वीज खांबांवर, उड्डाणपुलांवर, घरांच्या छतांवरून थेट रस्त्यांपर्यंत फाइबर केबल्स आणि वायरचे जाळे बिनधास्तपणे लटकलेले दिसून येते. या केबल्सच्या देखभालीची कोणतीही ठोस व्यवस्था नाही, कोणाची जबाबदारी निश्चित नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही.
पोलीस प्रशासन ज्या प्रकारे चायनीज मांज्यावर कारवाई करते, त्याच धर्तीवर हे लटकलेले केबल्सही तितकेच धोकादायक ठरत आहेत. दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी या केबल्स कधीही जीवघेण्या ठरू शकतात. जसम रोड, राजकमल चौक, श्याम चौक, गाडगे नगर, रुक्मिणी नगर, बस स्थानक परिसर, रेल्वे ओव्हरब्रिज असा शहरात एकही भाग नाही जिथे ही समस्या आढळत नाही.
इतर अनेक शहरांमध्ये अंडरग्राउंड केबलिंग करून शहर अधिक सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्यात आले आहे. मात्र अमरावतीत कोणताही केबल ऑपरेटर मनमानी पद्धतीने केबल टाकतो आणि नंतर जबाबदारी झटकून मोकळा होतो. जुन्या, खराब आणि निष्क्रिय केबल्स वर्षानुवर्षे तशाच लटकत राहतात. ना महानगरपालिका कारवाई करते, ना संबंधित ऑपरेटर पुढे येतात.
प्रश्न असा आहे की प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? की वेळेत या गंभीर समस्येवर ठोस पावले उचलली जाणार आहेत?
अमरावतीकरांच्या सुरक्षिततेसाठी केबल व्यवस्थेवर तातडीने नियंत्रण, स्पष्ट नियम आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे.
आता प्रश्न फक्त एवढाच — प्रशासन जागं होणार कधी?



