सेंट्रल पार्कची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रशासकीय इमारतीच्या बाजूला उभारण्यात येणारे सेंट्रल पार्क हे शहराच्या वैभवात भर घालणारे महत्त्वाचे विकासकाम असून, त्याची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर रस्ता व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, सेंट्रल पार्क समोरील रिंगरोड, महापुरुषांच्या पुतळ्यांचे काम, कालवा परिसरातील जलतरण तलाव तसेच गौतम बाग ते फडतरे वस्ती चौपदरी रस्त्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सेंट्रल पार्क बाहेरील रिंगरोडचे सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. प्रशासकीय इमारत आणि सेंट्रल पार्कदरम्यान असलेल्या संरक्षक भिंतीची उंची वाढवावी. पदपथाच्या आतील बाजूस पाणी साचणार नाही, याची दक्षता घेत कामे करावीत.
सेंट्रल पार्कच्या समोरील जागेत महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येत असून, पुतळ्यांच्या मागील बाजूस आकर्षक भिंतीचे काम करण्यात यावे. पुतळ्यांना हार अर्पण करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांची उंची योग्य प्रमाणात ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्याचा विचार करावा. इंदापूर रस्त्यावर जड व अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात. तसेच इंदापूर रस्त्याचे सुशोभीकरण आणि गौतम बाग ते फडतरे वस्ती चौपदरी रस्त्याचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कालवा परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाच्या कामात उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात यावे. परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी तसेच गाळ्यांच्या दर्शनी भागावरील नावांचे फलक एकसारखे दिसतील, याकडे लक्ष द्यावे. शहरात अधिकाधिक वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक विकास साधावा. प्रलंबित विकासकामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, उपअभियंता सुभाष पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



