International NewsLatest NewsMaharashtra

क्रिकेटच्या नावाखाली मोठा घोटाळा!

संघात स्थान मिळवून देण्याच्या बहाण्याने पिता-पुत्राची 14.30 लाखांची फसवणूक

देशात क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो मुलांच्या भावनांचा गैरफायदा घेत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार क्रिकेट संघात मुलाची निवड करून देण्याचं आमिष दाखवत एका पिता-पुत्राची तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


नेमकं काय घडलं?

हापूर येथील रहिवासी ब्रिजेश सिंह यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा भावेश कुमार हा हापूरमधील संस्कार क्रिकेट अकादमीत सराव करत होता. सन 2022 मध्ये एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान भावेशची ओळख बुलंदशहर येथील विराट उर्फ मुकुल त्यागी याच्याशी झाली.

मुकुल त्यागीने भावेशला आपल्या जाळ्यात ओढत, वाराणसीत राहणारे मोनू आणि सहर्ष आनंद यांचे बिहार क्रिकेटमध्ये चांगले कॉन्टॅक्ट असल्याचा दावा केला. तसेच ते वाराणसीत एमएस क्रिकेट अकादमी चालवतात, असेही त्याने सांगितले.


15 लाखांत बिहार संघात निवड करून देण्याचं आमिष

मुकुल त्यागीने 15 लाख रुपयांत भावेशला बिहार अंडर-19 संघात निवड मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. तसेच तो अंडर-19 एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांत किमान दोन सामने खेळेल, असा दावा केला. जर खेळला नाही तर पैसे परत देण्याची हमीही आरोपींनी दिली होती.


वडिलांचा विश्वास संपादन

सुरुवातीला ब्रिजेश सिंह यांनी या प्रस्तावाला नकार दिला. मात्र नंतर मुकुल त्यागी स्वतः त्यांच्या घरी आला आणि गाझियाबादमध्ये क्रिकेट अकादमी चालवणाऱ्या किशनशी फोनवर बोलून त्यांना विश्वासात घेतले. यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 दरम्यान ब्रिजेश सिंह यांनी मुकुल त्यागी आणि सहर्ष आनंद यांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या मार्गाने एकूण 14.30 लाख रुपये ट्रान्सफर केले.


बनावट कागदपत्रे आणि निवड पत्र

आरोपींनी भावेशला सरावासाठी बिहारला बोलावलं, बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्याचं बँक खातेही उघडलं. याशिवाय बनावट निवड पत्र देण्यात आलं. मात्र अखेर मुलाला कोणत्याही अधिकृत सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नाही.


पैसे मागितल्यावर टाळाटाळ, नंतर नकार

सामन्यात खेळण्याची संधी न मिळाल्याने पिता-पुत्रांनी पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी सुरुवातीला विविध सबबी सांगत वेळकाढूपणा केला आणि नंतर पैसे परत देण्यास थेट नकार दिला.


चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलीस अधीक्षक ज्ञानंजय सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, विराट उर्फ मुकुल त्यागी, किशन, मोनू आणि सहर्ष आनंद यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


क्रिकेट असोसिएशनकडून दावे फेटाळले

दरम्यान, वाराणसी क्रिकेट असोसिएशनचे संघटन सचिव पी. पी. आनंद मिश्रा यांनी सांगितले की, मोनू आणि सहर्ष आनंद हे उत्तर प्रदेश अंडर-19 संघात खेळल्याचा दावा करत असले, तरी त्यांचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button