बेघर बांधवांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर – कुलगुरू .. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

अमरावती – (दि. 25.12.2025) : मायबापांना बेघर करणे ही गंभीर समस्या असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू या नात्याने मला या बेघर बांधवांसाठी जी काही मदत करायची आहे, ती मी नक्कीच करेल. या बेघर बांधवांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. बडनेरा स्थित आधार शहरी बेघर लोकांच्या निवारा केंद्राला कुलगुरूंनी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भारतीय जैन समाज संघटनेचे अध्यक्ष श्री सुदर्शन गांग, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, विदर्भ कुष्ठरोगी सेवा संस्था, तपोवनचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई, विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. प्रफुल्ल गवई, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर, बार्टीच्या प्रकल्पाधिकारी अनिता गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आधार केंद्रातील व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत आधार केंद्राच्या व्यवस्थापक कु. ज्योती राठोड आणि पब्लिक एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा आधार केंद्राचे संचालक श्री राजे बसवनाथे यांचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात. तसेच आधार केंद्र बेघर बांधवांसाठी चांगले कार्य करीत असून त्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय जैन समाज संघटनेचे अध्यक्ष श्री सुदर्शन गांग, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, विदर्भ कुष्ठरोगी सेवा संस्था, तपोवनचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई, विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. प्रफुल्ल गवई, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर, बार्टीच्या प्रकल्पाधिकारी अनिता गवई, ज्येष्ठ समाजसेवक जवाहर गांग यांनी सुद्धा या निराधार बेघर बांधवांसाठी मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर असल्याचे मनोगतातून सांगितले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत पब्लिक एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्राला सदिच्छा भेट दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योति राठोड, सूत्रसंचालन राजू बसवनाथे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष गवई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित घोंगडे, विलास थोरात, किशोर मरकाम व निवारावासीयांनी अथक परिश्रम घेतले.



