Latest NewsMaharashtrapolitics

राज–उद्धव ठाकरे फक्त मुंबईत नाही तर ‘या’ 7 महापालिका एकत्र लढणार; संजय राऊतांनी वाचली यादी

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती आता जवळपास निश्चित झाली असून, युतीची अधिकृत घोषणा उद्या बुधवारी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान केली जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील युती आता लपून राहिलेली बाब नाही. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ही युती जाहीर करणं आवश्यक होतं. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सातत्याने संवाद सुरू असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येही चर्चा पूर्ण झाल्या आहेत.

ठाकरे बंधू कोणत्या महापालिका एकत्र लढणार?

संजय राऊत यांनी युतीतील महत्त्वाची माहिती देत ठाकरे बंधू एकत्र लढणार असलेल्या सात महापालिकांची यादी जाहीर केली. त्यानुसार शिवसेना आणि मनसे खालील महापालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत –

  • मुंबई महानगरपालिका
  • ठाणे महानगरपालिका
  • नवी मुंबई महानगरपालिका
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  • मीरा-भाईंदर महानगरपालिका
  • नाशिक महानगरपालिका
  • पुणे महानगरपालिका

या सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवरील चर्चा पूर्ण झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीसोबत जाणार नाही – संजय राऊत

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य युतीबाबत विचारणा केली असता संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
पुण्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. पुण्यात शिवसेना आणि मनसे एकत्र लढतील. काँग्रेस सोबत यायची असल्यास चर्चा होऊ शकते, मात्र भाजपासोबत असलेल्या सत्ताधारी घटकांशी आम्ही कोणताही समझोता करणार नाही,” असं राऊत म्हणाले.

अजित पवारांवर जोरदार टीका

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल केला.
संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींमध्ये अजित पवार आहेत. ते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासोबत आहेत. अशा परिस्थितीत महायुतीत राहण्याचा किंवा सत्तेत राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही,” असा आरोप राऊत यांनी केला.

मुंबईत युती निश्चित, काँग्रेसशी चर्चा मर्यादित

संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, मुंबईत राज–उद्धव ठाकरे यांची युती निश्चित असून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे.
मुंबईबाहेर काही ठिकाणी काँग्रेससोबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्या तरी मुंबईत काँग्रेससोबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्या अधिकृत घोषणा

दरम्यान, उद्या दुपारी 12 ते 12.30 या वेळेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा करणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button