electionLatest NewsYavatmal

यवतमाळ नगरपरिषद निवडणूक : आजी–माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; मतदानाला उत्साहात सुरुवात

यवतमाळ, दि. —
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत यंदा आजी व माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नगराध्यक्ष पदासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून वजनदार उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. भाजपकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या ॲड. प्रियदर्शनी उईके, शिवसेना शिंदे गटाकडून तेजस्विनी चांदेकर, काँग्रेसकडून माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियांका मोघे, तर ठाकरे गटाकडून वैष्णवी कोवे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय पाच अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

नगरपरिषदेत एकूण ५८ नगरसेवक पदांसाठी २९९ उमेदवार उभे असून, अनेक प्रभागांमध्ये बहुकोनी लढत पाहायला मिळत आहे. प्रमुख पक्षांकडून वेळेवर उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष किंवा अन्य पक्षातून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. शहरातील २४८ मतदान केंद्रांवर सव्वादोन लाखांहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

दरम्यान भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी मतदान केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.

मतदानानंतर मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळकर नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विकासाच्या मुद्द्यावर जनता भाजपलाच मतदान करेल आणि नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक भाजपाचेच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, यवतमाळ नगरपरिषदेवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button