AmravatiLatest News

महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश

अमरावती, दि. १९ :
राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत (महाआयटी) विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ पासून विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. मात्र सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याने त्यावर तात्काळ कार्यवाही करून अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त माया केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. हे अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्याबाबत शासन, आयुक्तालय, प्रादेशिक कार्यालय तसेच जिल्हा कार्यालयामार्फत वेळोवेळी विद्यार्थी व महाविद्यालयांना अवगत करण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना जिल्हा कार्यालयाकडून वारंवार लेखी सूचना देण्यात आल्या असून, सोशल मिडिया व वृत्तपत्रांमधूनही जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व राज्यांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. ही मुदत पुढे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली. तरीही अद्याप अनेक विद्यार्थी व महाविद्यालयांकडून अर्जांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील महाडीबीटी प्रणालीवरील विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज, सन २०१८-१९ प्रमाणे Admin कडून Auto Reject होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

दि. १५ डिसेंबरपर्यंतची जिल्हानिहाय प्रलंबित अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :

  • अमरावती जिल्हा : विद्यार्थी स्तरावर १,२६९ व महाविद्यालय स्तरावर १,५६५ अर्ज
  • अकोला जिल्हा : विद्यार्थी स्तरावर १,१७० व महाविद्यालय स्तरावर २,४१३ अर्ज
  • यवतमाळ जिल्हा : विद्यार्थी स्तरावर ४६८ व महाविद्यालय स्तरावर १,३८७ अर्ज
  • बुलढाणा जिल्हा : विद्यार्थी स्तरावर ६५० व महाविद्यालय स्तरावर १,९०१ अर्ज
  • वाशिम जिल्हा : विद्यार्थी स्तरावर ५९८ व महाविद्यालय स्तरावर १,६७१ अर्ज

अमरावती विभागातील एकूण सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी स्तरावर ४,१५५ तर महाविद्यालय स्तरावर ८,९३७ अर्ज प्रलंबित आहेत.

सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आणि विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयीन प्राचार्यांची राहील, असे स्पष्ट शब्दांत प्रादेशिक उपआयुक्त माया केदार यांनी नमूद केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button