नांदगाव पेठ पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या

अमरावती | दि. — :
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली असून २२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी वाळकी परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव मंगेश पाळणकर (वय २२ वर्षे, रा. सातूर्णा) असे आहे. वाळकी परिसरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत युवकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच आरोपी कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नसून नांदगाव पेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, तरुणाची हत्या झाल्याच्या घटनेमुळे सातूर्णा व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस तपासानंतरच या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



