अवकाळी पावसामुळे रावेर–यावल मतदार संघात मोठे नुकसान; आमदार अमोल जावळेंची भरपाईची जोरदार मागणी

रावेर–यावल मतदार संघात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.
विधानसभेत बोलताना आमदार जावळे यांनी सांगितले की, मतदार संघातील खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग आणि कपाशी ही पिके अवकाळी पावसामुळे पूर्णतः नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिके हातची गेल्याने पुढील शेती कशी करावी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी भरपाई तातडीने मंजूर करावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहनही त्यांनी विधानसभेत केले आहे.



