चक्रीवादळानंतर आपत्कालीन मदतीत भारताची अग्रगण्य भूमिका — श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाची माहिती

चक्रीवादळ ‘डिटवॉ’ मुळे श्रीलंकेत झालेल्या मोठ्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताने तत्काळ आपत्कालीन मदत आणि बचावकार्यांत अग्रगण्य भूमिका बजावली, अशी माहिती मंगळवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार डिसानायके यांच्या कार्यालयाने दिली. या भीषण चक्रीवादळात ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती अनुर कुमार डिसानायके यांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात भारत श्रीलंका आणि तेथील जनतेसोबत दृढपणे उभा आहे,” असे स्पष्ट केले.
भारतीय बचाव पथके, आपत्कालीन साहित्य आणि तातडीच्या मदत उपायांसह मदत पोहोचवण्यात भारत अग्रेसर असल्याचे श्रीलंकन प्रशासनाने नमूद केले आहे.
चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन आणि मदतकार्य सुरू असून, भारताकडून मिळालेली तत्पर मदत श्रीलंकन जनतेसाठी मोठा दिलासा ठरल्याचे सांगितले जात आहे.



