AmravatiLatest NewsLocal News

मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह, आनंद आणि फिटनेसची मेजवानी

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने, आयुक्त व प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्रिय उपस्थितीत रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकरांना एका अविस्मरणीय अनुभवाची मेजवानी दिली. मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसर पहाटेपासूनच नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, कला आणि सामाजिक संदेश यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाने निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

स्टेज-१: फिटनेस आणि जनजागृतीचा दमदार प्रारंभ
या उपक्रमाची सुरुवात पहाटे ६ वाजता Amravati Road Runners गटाने २० किमी धावण्याची प्रभावी सुरुवात करून केली, ज्याने उपस्थितांना फिटनेसची प्रेरणा दिली.

योग आणि शांतता (६.३० वा.): संदीप मंडाले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शांत व चैतन्यपूर्ण योग सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

झुंबाचा जोश (७.०० ते ७.५० वा.): कविता शेंडे आणि विजयालक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटने वातावरणात उत्साह भरला. जोशपूर्ण संगीत आणि थिरकणाऱ्या गर्दीमुळे परिसर उत्सवी बनला.

पथनाट्य आणि संदेश (७.५० ते ८.०० वा.): दिशा संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या “स्वच्छ अमरावती – सुंदर अमरावती” या संदेशावर आधारित पथनाट्याने स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत प्रभावी जनजागृती केली.

यावेळी धावपटूंच्या ३ स्पर्धकांचा आणि सायकलिंग क्षेत्रातील ८ जणांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्टेज-२: खेळ, कौशल्ये आणि मनोरंजक स्पर्धा
दुसऱ्या स्टेजवर नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला:

मनोरंजक खेळ (७.१५ वा. पासून): प्रेक्षक आणि नागरिकांना सहभागी करून घेणारे १० मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. सर्व वयोगटातील लोकांनी या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला.

स्लो सायकलिंगचे अनोखे कौशल्य (७.३० वा.): Amravati Cycling Association च्या सायकलपटूंनी स्लो सायकलिंगचे थरारक कौशल्य आणि सायकलवर संतुलन राखत दाखवलेल्या कलाबाज्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्टेज-३: संगीत, कलाविष्कार आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक
तिसऱ्या स्टेजवर सांस्कृतिक आणि शौर्याची मेजवानी मिळाली:

लाइव्ह संगीत (६.३० वा. पासून): ऋषिकेश होले यांच्या लाइव्ह आर्केस्ट्राने भक्तीगीतांपासून ते हलक्या-फुलक्या गाण्यांपर्यंत विविध रचना सादर करत उपस्थितांना संगीताच्या सुरांनी मंत्रमुग्ध केले.

मर्दानी खेळ (प्रात्यक्षिक): फिजिकल फिटनेस अँड सेल्फ-डिफेन्स ट्रेनिंग सेंटर, बडनेरा यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लाठी-काठी, दानपट्टा, गटका (भवरा) यांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

आयुक्तांचे आवाहन: ‘निरोगी अमरावती’चे स्वप्न
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या मनोगतातून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, “शहरातील रस्ते ही फक्त वाहतुकीची साधने नसून सार्वजनिक जीवन समृद्ध करणारे खुले प्रांगण आहेत. कुटुंबासह मोठ्या संख्येने नागरिकांनी धावणे, योग, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला—हे पाहून ‘निरोगी अमरावती’चे स्वप्न अधिक दृढ झाले आहे.”

आयुक्तांनी सर्व अमरावतीकरांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व अशा सामूहिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

“हॅपी स्ट्रीट्स” हा फक्त कार्यक्रम नसून समृद्ध, उत्साही आणि आरोग्यदायी अमरावतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा नागरी उपक्रम आहे.”

या मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, पोलीस उपायुक्त शाम घुगे व गणेश शिंदे, उपायुक्त योगेश पिठे व नरेंद्र वानखडे, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, तसेच कविता शेंडे (झुंबा ग्रुप), अक्षय गावंडे (निवेदक), एच.व्ही.पी.एम. जिमनास्टिक आणि मनपाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button