AmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावतीत बॉम्बस्फोटाचा निनावी कॉल; शहरात पोलिसांची धावपळ, सर्च मोहीम तीव्र

अमरावती, 28 नोव्हेंबर:
अमरावती पोलिस कंट्रोल रूमवर शुक्रवारी उशिरा रात्री आलेल्या निनावी बॉम्बस्फोटाच्या कॉलने शहरात खळबळ उडाली. अमरावतीत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देत आलेल्या या कॉलनंतर पोलिस आयुक्तालयाने तत्काळ सज्जता तपासणी सुरू केली.

कॉल मिळताच बडनेरा, सिटी कोतवाली, राजापेठ, नागपुरी गेट, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यांना तातडीचा अलर्ट देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शहरातील प्रमुख चौकांमध्ये राजकमल चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक आणि आढी चौकात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली.

पोलिसांनी सहा पोलीस स्टेशनांच्या हद्दीत नाकाबंदीद्वारे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली. यासोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसमध्येही तपासमोहीम पार पडली.

दरम्यान, सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून धमकी देणाऱ्या कॉलचे लोकेशन शोधले असता ते इंदोरमध्ये असल्याचे समोर आले. यानंतर अमरावती पोलिसांनी तात्काळ इंदोर पोलिसांशी संपर्क साधला.

इंदोर पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली असून अमरावती पोलिसांचे पथक त्याला घेण्यासाठी मध्यरात्रीच इंदोरकडे रवाना झाले आहे.

या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणताही अनिष्ट प्रकार घडला नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button