बायोटेक्नॉलॉजी विभागातील महिला उद्योजकांना बीज निधी प्राप्तकुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले अभिनंदन

अमरावती (दि.24.11.2025)-
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातील महिला उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी बीज निधी प्राप्त झाला आहे. बायोनिर्मित प्रा. लि. च्या संस्थापक संचालक कु. देवयानी गोळे यांना ए.आय.सी. सीड, आय.आय.एस.ई.आर. पुणे यांचेकडून, तर अवचित बायोव्हर्स प्रा. लि. च्या संस्थापक-संचालक डॉ. अदिती जोगळेकर, श्री मोरया अॅग्रो रिसर्च नॅनो बायोटेक प्रा. लि. च्या संस्थापक-संचालक डॉ. सुनिता बनसोड व इन्शिराह हर्बल्स प्रा. लि. च्या संस्थापक-संचालक कु. रुबिना शेख यांना विद्यापीठामार्फत स्टार्टअप इंडिया सीड फंड स्किमकडून निधी मिळाला आहे. सदर महिला उद्योजकांपैकी दोघी संशोधक आहेत, तर दोघी विभागाच्या माजी विद्यार्थीनी आहेत.
महिला उद्योजकांनी मिळविलेले हे यश बायोटेक्नॉलॉजी, उद्योजकता, शिक्षण आणि इकोसिस्टम या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. हा दृष्टिकोन शैक्षणिक संशोधन, उद्योजकीय कौशल्य विकास आणि उद्योग सहकार्य यांना जोडतो. विभागाचे हे प्रयत्न केंद्र सरकारच्या बायो-नवप्रवर्तकांना इन्क्युबेशन, मार्गदर्शन आणि प्रारंभिक टप्प्यातील निधीद्वारे सक्षम करण्याच्या मिशनला पुष्टी देतात. महिला उद्योजकांच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर, इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक प्रा. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव यांनी अभिनंदन केले आहे.



