सातारा : पिलानी गावात बिबट्याचा उच्छाद, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा | पिलानी (खालची) गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उच्छाद वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतात बैल चरायला घेऊन गेल्यानंतर बिबट्याने अचानक बैलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात बैलाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जाते. बिबट्या आणि बैलामध्ये झालेल्या झटापटीदरम्यान बैलाचे एक शिंग तुटले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या घटनेमुळे गावात घबराट निर्माण झाली आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
याचप्रमाणे, परिसरातील आसनगावमध्येही बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याच्या घटना नोंदल्या आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये रोष असून वनविभाग व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी होत आहे.



