नागपूर–जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, नागरिकांचे तीव्र आंदोलन

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कांद्री शिवाराजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. शेतकामासाठी पायी जात असलेल्या दोन महिलांना भरधाव क्रेटा कारने मागून धडक दिली. या धडकेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग अडवून तीव्र आंदोलन छेडले.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, MH 05 FG 4776 क्रमांकाची क्रेटा कार नागपुराकडून प्रचंड वेगाने पुढे जात असताना मंदा दिलीप उपासे (49) आणि प्रमिला राजेश शेंद्रे (41), दोघीही रहिवासी कांद्री माईन, शेताकडे पायी जात होत्या. अचानक आलेल्या भरधाव कारने दोघींना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की महिलांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घाबरलेल्या कारचालकाने वाहन खुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून पसार झाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी चालकाला अटक केली.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला. रागावलेल्या नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग अडवून जवळपास दीड तास वाहतूक ठप्प केली. काही आंदोलकांनी टोल प्लाझामध्ये उभी असलेल्या अपघातग्रस्त कार पेटवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नागरिकांनी या अपघातासंदर्भात परिसरातील पेट्रोल पंप व्यवस्थापनालाही जबाबदार धरत पोलिस आणि टोल व्यवस्थापनाला जागेवर येण्याची मागणी केली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती शांत केली.



