citynewsGondiaLatest News

सडक अर्जुनीत मुख्याध्यापकाचा घृणास्पद प्रकार उघड – POCSO व ॲट्रॉसिटीखाली अटक

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षणक्षेत्राला कलंकित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे करणाऱ्या एका खाजगी शाळेतील मुख्याध्यापकाचे कृत्य उघडकीस आले असून, पालक व नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटबोरी/कोहळी येथील खाजगी शाळेतील मुख्याध्यापक कामेद दामोदर कापगते हा शिकवणीच्या बहाण्याने विद्यार्थिनींना एकट्या खोलीत बोलावत असे. या दरम्यान तो त्यांच्याशी अश्लील वर्तन करत असल्याचे पुढे आले. सुरुवातीला घाबरलेल्या विद्यार्थिनींनी मौन बाळगले; मात्र अखेर त्यांनी धाडस करून संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला.

घडलेल्या प्रकारानंतर संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली. तक्रार मिळताच शाळा समितीने पोलिसांत अहवाल नोंदवला. डुग्गीपार पोलिसांनी तत्काळ आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेत POCSO कायदा आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला. न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला थेट न्यायालयीन कोठडीत धाडण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात असुरक्षिततेची भावना पसरली असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकांवर कठोर आणि आदर्श स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना दुसऱ्या शाळेत घडली होती, त्यामुळे “गुरुजींचे नक्की काय चालले आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button