सूरतमध्ये परप्रांतीय कामगारावर अत्याचार; चाकूचा धाक दाखवून पाय चाटण्यास भाग पाडले

सूरत – गुजरातमधील सूरत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका परप्रांतीय कामगाराला मारहाण करताना आणि त्याला चाकूचा धाक दाखवून पाय चाटण्यास भाग पाडताना दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील सुधीर कुमार पांडे हा पीडित कामगार असून, तो सूरतच्या अमरोली परिसरातील एका भोजनालयात काम करत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये स्वत:ला ‘भोला भाई’ म्हणवणारा एक तरुण पीडितावर अत्याचार करताना दिसतो. व्हिडिओमध्ये पांडे “भोला भाई, मी कधीही सूरतला परत येणार नाही” असे म्हणताना ऐकू येतो.
पीडिताच्या म्हणण्यानुसार, कृष्णा यादव आणि भोला यादव या दोघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. तो सुरतमध्ये कृष्णासोबत काम करत होता, परंतु काम सोडून दुसरीकडे गेल्यानंतर आरोपींनी त्याला एका खोलीत बंद करून मारहाण केली.
या प्रकरणी सूरत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओ आणि पीडिताने दिलेल्या साक्षीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पीडित व्यक्ती भीतीपोटी सूरतमधून पलायन केल्याचे समजते.



