थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची धडक मोहीम

यवतमाळ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेचा शुभारंभ प्रभात फेरीने करण्यात आला. ही फेरी तहसील चौकातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात संपन्न झाली. कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबवण्यात येत आहे. शहरातील विविध विभागांतर्गत थकीत पाणीपट्टी वसुल करण्यासाठी विशेष वसुली पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून न भरलेल्या बिलांमुळे प्राधिकरणास मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, आणि त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांवरही परिणाम होत आहे.
म्हणूनच नागरिकांनी आपल्या थकीत पाणीपट्टीची रक्कम तातडीने भरावी, असं आवाहन प्राधिकरणाने केलं आहे. कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी स्पष्ट केलं की, “पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्राधिकरणाला आर्थिक स्थैर्य आवश्यक आहे. म्हणून नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून सहकार्य करावं.” या मोहिमेमुळे शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होईल आणि थकीत रकमेची वसूलीही वेगाने होईल,
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



