रामटेक गढमंदिरात प्रभू श्रीरामांच्या काकड आरतीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रामटेक – दिवाळीच्या पहाटे साडेचार वाजता रामटेकच्या प्राचीन गडमंदिरात प्रभू श्रीरामचंद्र महाराजांच्या काकड आरतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. रामगिरी पर्वतावर वसलेले हे गडमंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत पहाटेची आरती सुरू असते. पहाटे चारपासूनच ‘जय श्रीराम’च्या घोषात संपूर्ण गडमंदिर परिसर दुमदुमला होता. या काकड आरतीसाठी नागपूर, कन्हान, भंडारा, तुमसर, सावनेर, देवलापार आणि मध्यप्रदेशातून हजारोच्या संख्येने रामभक्त रामटेकला दाखल झाले होते. या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, समाजसेविका ज्योती गोपी कोल्हेपरा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. आरती संपल्यानंतर मंदिर परिसरात रामभक्तांनी फटाक्यांची शानदार आतिषबाजी केली. यानंतर रामराज्य ढोल ताशा पथकाने आपल्या पारंपरिक वादनाने प्रभू श्रीरामांना मानवंदना दिली. ढोल-ताशांच्या गजरात श्रद्धेचा जणू महापूर उसळला.
आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो रामभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दीपोत्सवाचा आनंद भक्तिभावाने साजरा केला. रामटेक गडमंदिरातील हा काकड आरतीचा सोहळा आजही श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक ठरत आहे.



