कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; जालन्यातील धक्कादायक घटना

जालना (20 ऑक्टोबर 2025): शहरातील यशवंत नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना घडली आहे. परी दीपक गोस्वामी असे या मृत मुलीचे नाव असून, तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेदरम्यान परीच्या चेहऱ्यावर तीव्र जखमा झाल्या होत्या. रविवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास परीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



