नंदूरबारमध्ये चांदसैली घाटात पिकअप गाडी कोसळून ८ जणांचा मृत्यू

नंदूरबारमधील सातपुड्यातील चांदसैली मृत्यूचा घाट बनला. चांदसैली घाटातील तीव्र वळणावरून चारचाकी गाडी थेट 100 फुटावरून कोसळली. अवैध प्रवासी वाहतूक आणि खराब झालेल्या घाट मार्गाने 8 जणांचा बळी घेतला. १५ प्रवासी पिकअपमध्ये बसले होते. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते.
नंदूरबारच्या सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेहून परतणाऱ्या या भाविकांसोबत विपरित घडलं. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. या भीषण अपघातात ८ भाविक दगावले.
अपघातात वाहनाच्या मागच्या भागात बसलेले प्रवासी दबले गेले. त्यांना अपघातात जबर मार लागला. तर भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आदिवासी समुदायासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या यात्रेसाठी भाविक गेले होते. अपघातानंतर गंभीर जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
पिकअप टेम्पोमध्ये १५ हून अधिक प्रवासी होते. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ऐन दिवाळीतील अपघाताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.



