यवतमाळमध्ये शेतशिवारात गांजाची शेती! ३७ किलो गांजा जप्त

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नगरवाडी गावाच्या शेतशिवारात शेतातील पिकांमध्ये गांजाची झाडे आंतरपिकासारखी लावण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नारायण मेटकर या शेतकऱ्याच्या शेतात ही लागवड करण्यात आली होती.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नगरवाडी शिवारात छापा टाकला.
तपासादरम्यान, शेतात तब्बल ३१ लहान-मोठी गांजाची झाडे आढळली. त्याचे वजन ३७ किलो ५० ग्रॅम एवढे असून, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास एक लाख ८७ हजार ५० रुपये इतकी आहे. पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त करून ताब्यात घेतली असून गजानन मेटकर यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यवतमाळ जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून पोलिसांनी गांजाच्या लागवडीवर लगाम लावण्यात यश मिळवले आहे.



