“पुण्याचा चाकण प्रकल्प जागतिक विमान उद्योगासाठी ठरत आहे महत्त्वाचा”

पुणे, १६ ऑक्टोबर २०२५ – पुण्याजवळील चाकण औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेला जीई एरोस्पेसचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमान उद्योगासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. या प्रकल्पातून विमान इंजिनांसाठी अत्यावश्यक आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त घटकांची निर्मिती केली जाते. हे घटक LEAP, GEnx आणि GE9X सारख्या प्रगत विमान इंजिनांमध्ये वापरले जात असून, त्यांचा वापर जगभरातील आघाडीच्या विमान कंपन्यांमध्ये केला जातो.
या प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि उत्पादन नियोजन अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, अशी माहिती जीई एरोस्पेसचे जागतिक उत्पादन प्रक्रिया आणि पुरवठा साखळीचे कार्यकारी संचालक अमोल नागर यांनी दिली.
२०१४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाने नुकतीच १० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, त्यानिमित्त कंपनीने २४० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. सध्या भारतात सेवेत असलेल्या १,४०० हून अधिक विमानांमध्ये जीई एरोस्पेसची इंजिने वापरली जात आहेत. विमानवाहतुकीत झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे या इंजिन घटकांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यासाठी प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यात येत आहे.
अमोल नागर यांच्या माहितीनुसार, चाकण प्रकल्पातून १,००० पेक्षा अधिक प्रकारचे अत्यावश्यक विमान घटक उत्पादित केले जातात. AI च्या मदतीने मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण करणे अधिक सुलभ झाले असून, त्याच्या आधारे भविष्यातील उत्पादन नियोजन आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी बनले आहे.
कंपनी फक्त उत्पादनापुरती मर्यादित न राहता, कौशल्यविकासालाही तितकेच महत्त्व देते. कर्मचाऱ्यांसह अभियांत्रिकी पदविका घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी विविध महाविद्यालयांशी भागीदारी करण्यात आली आहे. आजवर ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी विमाननिर्मितीच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतल्याची माहिती प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित सिंह यांनी दिली.
पुण्यातील हा प्रकल्प केवळ स्थानिक नाही, तर जागतिक स्तरावर भारताच्या औद्योगिक क्षमतेचा ठसा उमठवणारा एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे.



