Latest NewsMaharashtra

भोकरदनमध्ये शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा

भोकरदन – भोकरदन शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रमुख वक्ते म्हणून आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार निलेश लंके, खासदार डॉ. कल्याण काळे, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले — “सध्या अर्धा महाराष्ट्र अतिवृष्टी आणि महापुराच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतकऱ्यांचे पिक, पशुधन, आणि घरदार उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी सरकारकडून तातडीने कर्जमाफी जाहीर होणे गरजेचे आहे.”
त्यांनी आठवण करून दिली की, “कोविड काळात ठाकरे सरकारने २९ हजार कोटींची कर्जमाफी केली होती, तर २००९ साली शरद पवार कृषिमंत्री असताना देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. पण आता सरकारने डोळेझाक केली आहे.”
माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही मंचावरून भाजप नेते रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले — “मतदारसंघात मनमानी सुरू आहे. विहिरींसाठी शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपये घेतले जातात. कोणाचे हात ओले झाले, याचं उत्तर कोण देणार?”
तसेच, “एका ग्रामसेवकाला थेट बीडीओ बनवून पंचायत समितीची वाट लावली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत म्हटलं — “विरोधी पक्षनेते असताना ते ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते, पण आता मुख्यमंत्री झाल्यावर म्हणतात की तरतूदच नाही! हा सरळ शेतकऱ्यांचा अपमान आहे!”

पुढे ते म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी १२ तारखेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार.”
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान इतके मोठे आहे की, उभी शेती सडून गेली, तर नदीकाठची शेती मातीसह वाहून गेली आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज आणि थकबाकी कर्जमाफी दोन्ही आवश्यक आहेत, असं पवारांनी ठामपणे सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button