स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील तळणी फाटा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन छेडले. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे आणि थकित कर्जाची तात्काळ माफी करावी – या प्रमुख मागण्यांसह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर उतरवू,” असा इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पूर्णा-नांदेड मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी म्हणाले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल.”



