“‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजनेद्वारे ISRO व NASA भेटीसाठी विद्यार्थ्यांना संधी”

अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दरवर्षी इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे. काय आहे नेमकी ही योजना? याचा कोणत्या विद्यार्थ्यांना होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.
दरवर्षी 51 निवडक विद्यार्थ्यांना संधी
विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेअंतर्गत दरवर्षी 51 निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) भेटीची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
स्पर्धेचे स्वरूप कसे असेल?
शालेय शिक्षण विभाग तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करतो. तहसील स्तरावरील स्पर्धेतून निवडलेल्या 21 उत्कृष्ट प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
इस्त्रो आणि नासाला भेट
जिल्हा स्तरावरील स्पर्धांमधून 51 सर्वोत्कृष्ट प्रकल्प निवडून त्यांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इसरो) ला भेटीची संधी मिळेल. तर, राज्य स्तरावरील 51 अंतिम विजेत्यांना नासा भेटीचे विशेष बक्षीस देण्यात येईल.
स्पर्धकांना प्रोत्साहन
विजेत्यांप्रमाणेच इतर स्पर्धकही मेहनत घेतात. त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान व्हावा, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती जवळून पाहता येईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलीय.
आर्थिक तरतूद आणि मंजुरी
तहसील आणि जिल्हा स्तरावरील भेटींचा खर्च जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) निधीतून केला जाईल. मात्र, नासा भेटीसाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना काय आहे आणि त्यात कोण सहभागी होऊ शकते?
ही योजना महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे, ज्याअंतर्गत विज्ञान प्रकल्प स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नासा, इसरो आणि विज्ञान केंद्रांना भेटीची संधी मिळते. तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावरील विज्ञान स्पर्धांमध्ये भाग घेणारे शालेय विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तहसील स्तरावर 21, जिल्हा स्तरावर 51 आणि राज्य स्तरावर 51 विजेत्यांना या भेटींसाठी निवडले जाते.
या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या भेटींचे आयोजन केले जाते?
या योजनेत तीन स्तरांवर भेटींचे आयोजन आहे:तहसील स्तर: शीर्ष 21 प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट.जिल्हा स्तर: शीर्ष 51 प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील इसरोला भेट.राज्य स्तर: 51 अंतिम विजेत्यांना अमेरिकेतील नासाला भेट.या भेटींमुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.
या भेटींचा खर्च कोण उचलणार आणि त्यासाठी मंजुरीची प्रक्रिया काय आहे?
तहसील आणि जिल्हा स्तरावरील भेटींचा खर्च जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) निधीतून केला जाईल. नासा भेटीसाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी प्रस्ताव सादर केला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.



