JalnaLatest NewsMaharashtra

धावडा गावात दूषित पाणीपुरवठा: नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातलं मोठं गाव, धावडा. या गावात सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. एकतर पाणी नियमित येत नाही आणि जेव्हा येतं, तेव्हा ते पिण्यायोग्य नसतं. रविवार, २१ तारखेला गावातील नळांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच वणवण करावी लागते. त्यातच, महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदा येणारे पाणीदेखील अशुद्ध असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या दूषित पाण्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असे अनेक आजार बळावले आहेत, ज्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले आहे.

या दूषित पाण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी उघड्या नाल्यांमधून जाते आणि ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी थेट जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळावाटे घराघरात पोहोचत आहे.

या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावं आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झालं, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही धावडा गावातील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button