तई बुजरूक गावात दारूबंदी जनजागृती रॅली
भंडारा – भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई/बुजरूक गाव दारूबंदीच्या लढाईत आघाडीवर आले आहे. गावकऱ्यांनी आज मोठ्या उत्साहात आणि संतापाच्या गर्जनेत दारूबंदी जनजागृती रॅली काढली. ग्रामपंचायतीने यापूर्वीच बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना नोटिसा देऊन इशारा दिला होता, परंतु दारू विक्री थांबली नाही. त्यामुळे अखेर गावकरी थेट रस्त्यावर उतरले आणि दारूबाजांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “दारू नाही तरच तई बुजरूक टिकणार!” “दारूवाले, दारू विकणे सोडा…नाहीतर गावकरी जागा दाखवतील!” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. या रॅलीत ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे सदस्य, ग्रामसुरक्षा दल, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गावकऱ्यांचा संदेश स्पष्ट आहे – दारूबंदी ही फक्त मोहीम नाही, तर ही गावाची क्रांती आहे आणि गावकऱ्यांच्या निर्धारासमोर कोणीही दारू विक्रेते टिकणार नाहीत. या रॅलीनंतर परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनानेही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.



