नागरिकांसाठी दिलासा! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्रित; आता अधिक लाभ सहज मिळणार

मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ यांना एकत्र करून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्य लाभ सहज मिळणार आहेत.
एका वर्षात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार!
या एकत्रित योजनेअंतर्गत, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. यामध्ये १३५६ उपचार पद्धतींचा समावेश असून, शासकीय आणि खासगी (अंगीकृत) रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.
कोणाला मिळणार लाभ?
योजनेत खालील कुटुंबांचा समावेश आहे:
पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा योजना रेशनकार्डधारक
पांढरे रेशनकार्डधारक
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय
या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
आयुष्मान कार्ड कसे तयार करावे?
आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र कर्मचारी किंवा स्वस्त धान्य दुकान चालक यांच्याद्वारे कार्ड तयार करता येईल.
स्वतः कार्ड तयार करण्यासाठी:
https://beneficiary.nha.gov.in
‘आयुष्मान भारत’ मोबाईल अॅप
कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
अद्ययावत शिधापत्रिका (रेशनकार्ड)
आधार कार्ड क्रमांक
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
नागरिकांनी पुढाकार घ्यावा
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःचे आयुष्मान कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना आरोग्य क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला



