AkolaCrime NewsLatest NewsMaharashtra

अकोल्यात कौटुंबिक वादातून भीषण हत्याकांड! जावयाचा सासरच्यांच्या मारहाणीत मृत्यू – 3 जण अटकेत

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात कौटुंबिक वादातून भीषण हत्याकांड घडले असून, एका व्यक्तीचा त्याच्या सासरच्यांकडून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन महिला आणि एका युवकाला अटक केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव नागेश गोपनारायण (वय 40) असे असून, तो आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला असताना त्याची हत्या करण्यात आली. नागेश आणि त्याची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत होते. या कौटुंबिक वादामुळेच नागेश संतप्त होता आणि तो थेट सासरवाडी गाठून पत्नीची विचारणा करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेशने सासरी गेल्यावर मोठ्या आणि लहान मेहुणींना मारहाण केली. हे पाहून मोठ्या मेहुणीचा मुलगा आक्रमक झाला आणि त्याने जवळच पडलेले लाकूड व तीक्ष्ण हत्यार घेऊन नागेशवर डोक्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात नागेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पातूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढले आणि अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे नागेशच्या दोन मेहुणी आणि मोठ्या मेहुणीचा मुलगा आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नागेशची पत्नी छाया हिच्या इतर नातेवाईकांवरही पोलिस संशय घेत आहेत आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी तपास अधिक खोलवर नेण्यात येत आहे.

या हत्याकांडामुळे अंबाशी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, कौटुंबिक वाद कोणत्या थराला जाऊ शकतो याचा धक्कादायक प्रत्यय या घटनेमधून आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button