बायकोचा खून करून पतीनेच दिली हरवल्याची तक्रार

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील साखर कारखान्यात मेंटेनन्सचे काम करणारा जिया उल हक हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो पत्नी फरीदा आणि दोन मुलांसह इथे राहत होता. काही दिवसांपासून त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या मित्र सज्जाद, अरबाज, साकीर आणि आजमअली यांच्या मदतीने खूनाचा कट रचला.
घटनेच्या दिवशी त्याने तोंडार येथील घरातच पत्नीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये भरून तिरू नदीच्या काठावर टाकून दिला. काही दिवसांपूर्वी ही सुटकेस आढळल्यावर मृतदेह कोणाचा आहे, हे स्पष्ट नव्हते. मात्र पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघडकीस आली.
खून केल्यानंतर, जिया उल हक पत्नी हरवल्याचे नाटक करू लागला. तो उत्तर प्रदेशात सासरवाडीत जाऊन मुलांना सोडून आला आणि परत येऊन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पण त्याने दिलेल्या पत्नीच्या वर्णनात आणि पोलिसांना सापडलेल्या मृतदेहात साम्य आढळल्याने पोलिसांना संशय आला.
तपासादरम्यान पोलिसांनी त्याला चौकशीसाठी धरले असता, शेवटी त्याने खुनाची कबुली दिली. पत्नीच्या खुनात आपल्या मित्रांनी मदत केल्याचेही त्याने सांगितले.
या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेमुळे हा गुन्हा काही दिवसांतच उघडकीस आला आहे.



