Latest NewsMaharashtraWardha

अजित पवारांची मिश्कील शैली पुन्हा एकदा चर्चेत; सुनेत्रा पवारांच्या प्रश्नावर दिलं खोचक उत्तर

वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला, जेव्हा वर्ध्यातील पत्रकार परिषदेत त्यांना त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी नेहमीच्या शैलीत या प्रश्नाला उत्तर देत उपस्थितांना खळखळून हसवले.

वर्धा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी अजित पवार वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी, जलसंपदा, शिक्षण, पाणी व्यवस्थापन आणि रोजगार निर्मिती अशा अनेक विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही आणि प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा.”

मात्र या दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच क्षण निर्माण झाला. एका पत्रकाराने विचारले की, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या…” या प्रश्नावर अजित पवारांनी सुरुवातीला हात जोडले, कपाळावर हात मारला आणि मग मिश्कील अंदाजात म्हणाले, “माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते, हे मला मिनिट टू मिनिट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलंय, मी आता विचारतो – ‘का गं, कुठे गेली होतीस?’”

या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांकडे पाहत म्हणाले, “तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा. पण अजित पवार वर्ध्यात आले आहेत, तर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारा. तुम्ही विचाराल कुठे ब्रेकिंग न्यूज मिळेल. मग अजित पवार काय म्हणाले हे दाखवलं जातं, आणि समोरच्याचं म्हणणंही त्यात लावलं जातं. हे सगळं काय चाललंय?” अशा शब्दांत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

अजित पवारांच्या या मिश्कील आणि सडेतोड शैलीमुळे पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या उत्तराने एकीकडे हशा पिकवला असला तरी दुसरीकडे माध्यमांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवर त्यांनी नेमकी टिप्पणी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button