आशिया कप हॉकी २०२५ मधून पाकिस्तानची माघार, भारत-पाकिस्तान सामना रद्द.

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून, त्याचा परिणाम आता क्रीडा क्षेत्रावरही दिसून येत आहे. भारतातील बिहार राज्यातील राजगीर येथे होणाऱ्या आशिया कप हॉकी २०२५ स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रद्द झाला आहे.
पाकिस्तानने सुरक्षा कारणांमुळे दिला नकार
२७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या काळात होणाऱ्या या स्पर्धेत भारत, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि चायनीज तैपेई या संघांसह पाकिस्तानचाही सहभाग अपेक्षित होता. परंतु, भारताने व्हिसा देण्यास तयारी दर्शवूनही, सुरक्षा कारणांचे कारण देत पाकिस्तान हॉकी महासंघाने भारतात येण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला आमंत्रण
पाकिस्तानने माघार घेतल्यानंतर भारतीय हॉकी व्यवस्थापनाने बांगलादेशला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. ही स्पर्धा जिंकणारा संघ २०२६ मध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. तर, त्यानंतरच्या क्रमवारीत असलेले पहिले ५ संघ विश्वचषक पात्रता फेरीत खेळतील.
क्रिकेटप्रमाणेच हॉकीमध्येही दोन्ही देशांमधील राजकीय तणावाचा परिणाम दिसून येत आहे. आगामी आशिया कप क्रिकेट स्पर्धाही तटस्थ ठिकाणी, म्हणजेच यूएईमध्ये खेळवली जाणार आहे.



