शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला; शेतमजूर वृद्ध महिलेचा मृत्यू

जळगाव : बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे देवगावसह जळगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतात पीक निंदणीचे काम करत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात घडली आहे. बिबट्याने हल्ला केल्याने महिलेने आरडाओरड केली असता बिबट्या पळून गेला. मात्र गंभीर जखमांमुळे महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
जळगाव तालुक्यातील देवगाव येथील इंदुबाई वसंत पाटील (वय ७३) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान इंदुबाई पाटील या सकाळी घरातील कामे आटोपून शेतात कापूस निंदणी करण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. इंदुबाई या शेतात एकट्याच होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने हल्ला केल्याने इंदुबाई या जोरात ओरडू लागल्या. ओरडण्याचा आवाज ऐकून जवळपासच्या शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांनी तात्काळ धाव घेतली.
परिसरात घबराट
दरम्यान इंदुबाई यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पसार झाला होता. बिबट्याने त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिस आणि वन विभागाला देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
नाशिकरोड परिसरात बिबट्याचे दर्शन
नाशिकरोडच्या जयभवानी रोडवरील लोणकर मळा येथे पहाटे बिबट्याचे दर्शन झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या फिरताना कैद झाला असून स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची परिसरात दर्शन होत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. यामुळे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली असून मागील ५–६ दिवसांत बिबट्याचे चौथ्यांदा दर्शन झाले आहे.



