AmravatiLatest NewsUncategorized

विद्यापीठाचे संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता व्यासपीठ: बायोटेक्नॉलॉजी व रिसर्च इन्क्युबेशन फाऊंडेशन सहकार्याने

अमरावती : नवोपक्रम, उद्योजकता व संशोधनाच्या व्यवसायिकरणासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये सहकार्यात्मक करार करण्यात आला आहे. या भागीदारीमुळे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नवोपक्रम, उद्योजकता आणि संशोधनाच्या व्यवसायीकरणाच्या दृष्टीने एक मजबूत व्यासपीठ निर्माण होणार आहे. या सहकार्यात्मक करारामुळे स्टार्टअप्सना आता बायोटेक्नॉलॉजी विभागातील अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच पायाभूत सुविधांचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञानाचे विद्यार्थी आणि संशोधकांना स्टार्टअप कल्पना, प्रोटोटाइप आणि व्यवसाय मॉडेल विकासासाठी मार्गदर्शन मिळेल. एवढेच नव्हे, तर तांत्रिक आणि उद्योजकता केंद्रित कार्यक्रम, क्षमता निर्मिती कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रांना प्रोत्साहन मिळणार आहे. इकोसिस्टमच्या मदतीने जैवतंत्रज्ञान संशोधन बाजारपेठ तयार उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न, जिवतंत्रज्ञान स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन, जिवतंत्रशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थी आणि संशोधकांमध्ये नवोपक्रम, चिकित्सक विचार आणि उद्योजकतेची संस्कृती रुजविण्यास मदत होईल.

विद्यापीठाचे कुलगुरू तथा रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मिलींद बारहाते यांचे नेतृत्व, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे मार्गदर्शन आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांचे सकारात्मक प्रशासकीय पाठबळ तसेच न.न.सा. संचालक डॉ. अजय लाड, सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद यादव यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश साध्य करता आले, अशा भावना बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी व्यक्त केल्या. या सहकार्य कराराच्या माध्यमातून डी.बी.टी., भारत सरकारच्या अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार यासाठी जैवतंत्रज्ञान धोरणाचे एक बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि बायोफाउंड्री उपक्रम व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने उदयोन्मुख बायोटेक्नॉलॉजी संशोधकांना सक्षम करण्यास फार मोठी मदत होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button