डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान: अमेरिका-पाकिस्तान जवळ येणार, भारताला काय परिणाम?

अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25 टक्के आयातशुल्क (Donald Trump Tariff On India) लावण्यात आले आहे. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः जे आयातशुल्क लावतो, ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च तेल आयात करतो, एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो, हे सगळं अजिबात ठीक नाही. त्यामुळे भारत आता 25 टक्के आयातशुल्क भरणार, आणि त्याव्यतिरिक्त दंडही आकारला जाणार, आणि हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी- (US will develop massive oil reserves in Pakistan)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) सोशल मीडियाद्वारे सांगितले की अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे. या अंतर्गत, दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून भारताला बाजूला केले आहे. तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेने पाकिस्तानशी करार केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केलीय. एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला ही सुविधा देणार आहे.



