गोंदिया हादरलं! शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; सडक अर्जुनी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

गोंदिया : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथील शाळेत उघडकीस आली आहे. विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी तब्बल दोन वर्षे अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख (वय ५३, रा. कोहमारा) याने २०२३ पासून ते २०२५ पर्यंत सलग दोन वर्षे या अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. या गंभीर आणि संतापजनक प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर करण्यात आली होती.
तक्रार मिळाल्यानंतर चाइल्ड लाइनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान, संबंधित शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं. यानंतर, तात्काळ डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभाग आणि पालकवर्गात तीव्र संतापाची आणि चिंतेची लाट उसळली आहे. गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीकडूनच असं घृणास्पद कृत्य घडल्याने समाजातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. डुग्गीपार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधि : साहिल रामटेके



