वादग्रस्त पूजा खेडकरचं OBC नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र अखेर रद्द; नाशिक विभागीय आयुक्तांची मोठी कारवाई

नाशिक : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या (IAS Trainee Pooja Khedkar) वादग्रस्त प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पूजा खेडकरचे ओबीसी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (OBC Non-Creamy Layer Certificate) रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे.
खोटी ओळख आणि बनावट कागदपत्रांचा आरोप
पूजा खेडकरनं 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत खोटी ओळख आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून उत्तीर्ण झाल्याचा गंभीर आरोप आहे. याच कारणामुळे जुलै 2024 मध्ये UPSC ने तिची उमेदवारी रद्द केली आणि पुढील परीक्षा देण्यासही बंदी घातली. नंतर सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने तिला सेवेतून बडतर्फ केले.
प्रशिक्षणाची मुदत संपवली
IAS अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर खेडकरचे प्रशिक्षण सुरू झाले होते. मात्र, या वादानंतर तिची प्रशिक्षणाची मुदत आधीच संपवण्यात आली आहे. सध्या खेडकर या निर्णयाविरोधात मंत्रालयात तक्रार दाखल करण्याची तयारी करत आहेत.
चौकशीत धक्कादायक माहिती उघड
ओबीसी नॉन-क्रिमीलेयर आरक्षणासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पूजा खेडकरने आपल्या कुटुंबाचे उत्पन्न ६ लाख रुपये दाखवले होते; मात्र चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली.
तिच्या कुटुंबाकडे २३ जंगम मालमत्ता असल्याचे समोर आले.
कुटुंबाच्या मालकीच्या १२ गाड्या असल्याचे निष्पन्न झाले.
पूजाचे वडील दिलीप खेडकर, जे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते, त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी भरताना ४० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती
चार आठवड्यांची मागितली मुदत
विभागीय आयुक्तांनी खेडकरचा ओबीसी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज एक महिन्यापूर्वीच फेटाळला होता. मात्र, खेडकर हिने आता राज्याच्या ओबीसी विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळे यांच्याकडे पुन्हा अर्ज दाखल केला आहे आणि त्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.
दिव्यांग आरक्षणाचाही गैरवापर ?
खेडकरने फक्त ओबीसी नव्हे तर दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यांनी मानसिक आजार, कमी दृष्टी आणि हालचालींमध्ये अडचण असल्याचे दाखवत दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले होते, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.



