महानुभाव अध्यासन केंद्रातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन
अमरावती : श्री चक्रधर स्वामींची विचारधारा महान आहे. अध्यासनाच्या माध्यमातून त्या त्या महान विचारवंतांचे विचार विद्यार्थी व समाजातील तळागाळातील माणसांपर्यंत झिरपत जावे व समाजाची उन्नत व प्रगत दिशेने वाटचाल व्हावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्र व कर्तव्य मंगल कार्यालय, श्री प्रशांत महल्ले यांच्या सहकार्यातून कर्तव्य लॉन, रेवसा फाटा, अमरावती येथे पाच दिवसीय प्रबोधन व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना ते बोलत होते. उद्घाटक म्हणून कविश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा, महानुभाव राजापेठ आश्रम, अमरावती तसेच व्याख्याते उपाध्ये कुलाचार्य श्रीवर्धनस्त बिडकर बाबा रणाईचे जि. जळगाव, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचित, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. अण्णा वैद्य, अध्यासन केंद्र समन्वयक महंत डॉ. सोनपेठकर बाबा आदी विचारपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते पुढे म्हणाले, विद्यापीठातर्फे वेगवेगळे अध्यासन कार्यरत असून या अध्यासन केंद्रामार्फत प्रसार व प्रचार होतो आहे. वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये तरुण पिढीचा व्यसनाधीनतेकडे जाणारा लोंढा कसा थांबवता येईल, याविषयी सांगून प्रबोधन व्याख्यानमालेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यापीठ पातळीवरून अध्यासनाच्या माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल अध्यासन प्रमुख महंत सोनपेठकर बाबा यांचे कौतुक केले.
उद्घाटक कवीश्वर कुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा यांनी स्मृतिस्थळ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करुन स्मृतीस्थळातील निवडक आठवणींचा उल्लेख करताना कवी नरेंद्र यांची कवी निष्ठा किती महत्त्वाची होती, एकूणच महानुभाव्य वाङ्मयांमध्ये स्मृतिस्थळ या ग्रंथाचे काय महत्त्व आहे, याविषयी सविस्तर सांगितले. व्याख्याते उपाध्य कुलाचार्य वर्धनस्त बिडकर बाबा रणाईचे यांनी आपल्या विवेचनामध्ये स्मृतिस्थळ हा ग्रंथ मोलाचा असून, वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये समाजाभिमुख असणा-या महानुभावीय संप्रदाय व एकूणच समग्र समाजासाठी स्मृतिस्थळातील विचार तत्त्वज्ञान व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारधारेची सुसूत्रता कशी बघायला मिळते, याविषयी सांगितले.
दीप प्रज्वलन व विद्यापीठ गीताने उद्घाटनीय समारंभाची सुरुवात झाली. या पाच दिवसीय प्रबोधन व्याख्यानमालेचे प्रयोजन व महानुभाव अध्यासन केंद्राची भूमिका विषद करताना सोनपेठकर बाबा यांनी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठ पातळीवरून होणा-या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमात अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल महंत श्री कारंजेकर बाबा यांचा राऊळ माय राऊळ बापू, पारायण मंडळ अमरावतीर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. संदीप जुनघरे यांनी केले. व्याख्यान कार्यक्रमाला अमरावती शहरातील महानुभाव संप्रदायिक भिक्षुक मंडळी तसेच वासनिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



