आदिवासी आश्रमशाळेतील १३ मुलींना विषबाधा; कढी-भात खाल्ल्याने प्रकृती बिघडली, उपचार सुरू.

बुलढाणा: येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील १३ विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले. बाधित मुलींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील आठ विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली असून, पाच जणींवर उपचार सुरू आहेत. या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.
पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. रात्री कढी-भात खाल्ल्यानंतर १३ विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास वाढला. हा प्रकार लक्षात येताच सर्व मुलींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलींवर उपचार केले. यातील आठ मुलींची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मालकीची ही आश्रमशाळा आहे.



