Latest NewsMaharashtra

“अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार: आझाद मैदानात आंदोलन, शरद पवारांचा पाठिंबा”

मुंबईतील आझाद मैदानात सहा हजार अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी अनुदानासाठी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकारशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

मुंबई : राज्यातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ, अशा शब्दांत शिक्षकांना आश्वस्त केलं आहे.

आंदोलन करणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून न्याय मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्रातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मान देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनानी घेतली पाहिजे. काल मला रोहित पवारांकडून समजलं की इथं एक राज्यातील मंत्री येत आहेत. मला वाटलं की हे मंत्री येत आहेत तर चर्चा करून प्रश्न सोडवतील. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. राज्य सरकारला स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांनी उद्याची पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी अंतकरणापासून स्वीकारली आहे, त्यांच्यावर संघर्षाची वेळ येता कामा नये. शिक्षकांची जी मागणी आहे त्यासाठी लवकरात लवकर पैशाची तरतूद करा. तुमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाईल,” अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button