“ढाब्यावर कारवाई का नाही? अधिकारी पोचले… पण आदेशच नाही!”

अमरावती : एका बाजूला महानगरपालिका शहरात अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार मोहीम राबवत आहे, तर दुसरीकडे दस्तूर नगर बडनेरा मार्गावरील कारवाईने प्रशासनाच्या नियोजनशून्यता आणि गोंधळ उघड केला आहे.
दस्तूर नगर मार्गावरील पंजाबराव पाटील वऱ्हाडी ढाबा अनधिकृत असल्याचा आरोप आहे. या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण विभाग, विभागप्रमुख श्याम चावरे आणि पोलीस बंदोबस्तासह संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
परंतु आश्चर्य म्हणजे, नेमकी कारवाई करायची की नाही, याबाबतच उपस्थित उपअभियंता आणि इतर अधिकारी गोंधळलेले दिसले. कारवाईच्या तयारीत असलेलं पथक नक्की पाऊल उचलणार की नाही, हेच स्पष्ट नव्हतं. त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
- काय घडलं घटनास्थळी?
ढाबा अनधिकृत असल्याची तक्रार जुनी, याआधीही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. - ढाबा हटवण्याचे आदेश दिलेले, पण आजवर ठोस कारवाई झालेली नाही.
- आजच्या कारवाईसाठी अधिकारी पोहोचले, परंतु आदेश स्पष्ट नव्हते.
- स्थानीय नागरिकांची नाराजी आणि प्रश्नांची सरबत्ती.
- “जर कारवाई करायचीच नसेल, तर नाटकी ताफा का?” – रहिवाशांचा सवाल.
सिटीजन्सचा सवाल आणि प्रशासनाचं मौन
या ढाब्याविरोधात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत. स्थानिक रहिवासी प्रश्न विचारतायत की, “ढाबा बेकायदेशीर असेल तर कारवाई का होत नाही? आणि जर तो नियमीत असेल, तर वारंवार धमक्या का?”
लोकप्रतिनिधी या विषयावर गप्प, तर अधिकारी गोंधळलेले, अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.



