धारणी-खंडवा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू – वनविभागाचे दुर्लक्ष उघड

धारणी : धारणी फॉरेस्टच्या मुख्य कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावाजवळ आज सकाळी एक मोठा कोल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. ही घटना आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळूनही वनविभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, ही बाब अधिकच चिंताजनक ठरली आहे. कोल्हा मृतावस्थेत रस्त्यावर पडलेला असतानाच, त्यावरून आणखी काही वाहनं गेल्यामुळे त्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
वन्यप्राणी संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ घडलेल्या या घटनेने वनविभागाच्या कुशासनावर आणि निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोल्हा हा महाराष्ट्रातील संरक्षित वन्य प्रजातींपैकी एक असून त्याच्या मृत्यूबाबत कोणताही पंचनामा न केल्याने आणि शवविच्छेदनासाठीही तो न उचलल्याने, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
वन्यजीवप्रेमींनी ही घटना ‘मोठी शोकांतिका’ ठरवली आहे. मुख्यालयाजवळच जर वन्यप्राण्याच्या मृत्यूकडे दुर्लक्ष होत असेल, तर मेळघाटातील खोल जंगलात काय होत असेल, याचा विचार करता अंगावर शहारा येतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.



