महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली अग्निशमन विभागाची पाहणी
अमरावती : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार दिनांक ३० जुन,२०२५ रोजी अग्निशमन विभागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे, प्रभारी अग्निशमन अधिक्षक संतोष केंद्रे, अग्निशमन दल, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अग्निशमन विभागाची पाहणी करतांना निर्देश दिले की, सीसीटीव्ही लावण्यात यावे. अग्निशमन विभाग हे अद्यावत असणे आवश्यक असून संपुर्ण विभाग संगणीकरण करण्याचे काम करावे. अग्निशमन विभागाने सर्व अत्यावश्यक सेवेसह सज्ज असणे गरजेचे आहे. अग्निशमन विभागाने आलेल्या सर्व कॉलचा डाटा तयार करावा. अग्निशमन विभागाचे फलक तयार करुन विभागाचा मुख्य ठिकाणी लावावे. अग्निशमन विभागाने समन्वयाने काम करुन आपली जबाबदारी पुर्ण करावी. सदर विभागाचे व परिसराचे नियोजन व्यवस्थित करावे.
सदर अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अग्निशमन कर्मचारी, अग्निशमन वाहने, उपकरणे, चालक उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. या केंद्रामुळे या परिसरातील विविध भागात आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा विस्तार वाढत असतांना ज्याप्रमाणे पायाभूत सुविधा वाढत आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन केंद्रांची देखील निकड भासत आहे.
अग्नी सुरक्षा हा एक महत्वाचा विषय असून यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबतच नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे, कारण आगीच्या घटनेत सर्वात पहिला प्रतिसाद कोणी देत असतात, तर ते नागरिक असतात. त्यामुळे या विषयाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर शालेय मुलांमध्ये देखील या विषयाबाबत प्रबोधन करण्यात यावी व सर्व वाणिज्य आस्थापनांनी अग्निशमन यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या आस्थापनांमध्ये लावने बंधनकारक आहे व ते लावली की नाही तपासून घ्यावी तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमाचे काटेकोरपणे अमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले.



