नायगाव पंचायत समितीतील दिव्यांगांसाठी आलेल्या तीनचाकी सायकल्स पडल्या धुळखात

नांदेड : राज्य आणि केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंना मिळतो का? या प्रश्नाचे धक्कादायक उत्तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समितीमध्ये समोर आले आहे. मागील पाच वर्षांपासून या कार्यालयात पडून असलेल्या दिव्यांगांसाठीच्या तीनचाकी सायकल्स गंजून भंगारात निघाल्याची माहिती समोर आली आहे.
पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागात मागील काही वर्षांपूर्वी दिव्यांगांना वाटपासाठी शेकडो तीनचाकी सायकल्स आल्या होत्या. मात्र, या सायकल्स प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नसून, त्या कार्यालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत पडून राहिल्या. यामुळे एकीकडे दिव्यांग गरजूंना सायकलसाठी हेलपाटे मारावे लागत असताना, दुसरीकडे लाखो रुपयांचे सरकारी साहित्य धुळखात पडून आहे.
प्रत्येकी अंदाजे 12 ते 15 हजार रुपये किंमतीच्या शेकडो सायकल्स समाजकल्याण कार्यालयाच्या आवारात गंजून पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये काही सायकल्स पूर्णतः निकामी झाल्या असून काहींचे चाकं, हँडल, सीट्स गायब झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे थांबतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
दिव्यांग संघटनेची तीव्र प्रतिक्रिया
दिव्यांगांसाठीचा निधी, साहित्य, योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्ष लाभार्थींच्या हाती काहीच लागत नाही. पंचायतीत अधिकार्यांचे दुर्लक्ष, हलगर्जीपणा आणि जबाबदारीशून्य कारभारामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे दिव्यांगांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
- प्रमुख मुद्दे:
५ वर्षांपासून नायगाव पंचायत कार्यालयात तीनचाकी सायकल्स पडून - समाजकल्याण विभागाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार
- शेकडो दिव्यांग लाभापासून वंचित
- दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी



