“शाइस्ता परवीनला मिळाली नवदृष्टी : हरिना फाउंडेशनच्या मदतीने अंधत्वावर मात”
अमरावती : कर्करोगामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर संकट ओढवलेल्या शाइस्ता परवीन या महिलेला अखेर तिची दृष्टी परत मिळाली आहे. हरिना फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सामाजिक बांधिलकीतून वेळेत झालेल्या शस्त्रक्रियेमुळे हा चमत्कार घडू शकला.
शाइस्ता परवीन यांना कर्करोगाने डोळ्यांवर परिणाम करून अंधत्वाचा धोका निर्माण केला होता. प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. रोहित मुंधडा यांच्या मते तातडीने शस्त्रक्रिया झाली नसती, तर रुग्ण कायमची दृष्टी गमावली असती. मात्र आर्थिक दुर्बळतेमुळे शाइस्ताच्या समोर अडथळ्यांचे डोंगर होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची रक्कम पुरेशी नव्हती.
या कठीण वेळी हरिना फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला. सामाजिक कार्यकर्ते मो. झाकीर यांनी ही बाब हरिना फाउंडेशनचे शरद कासट यांच्याकडे मांडली. त्यांनी अध्यक्ष मनोज राठी यांच्याशी संपर्क साधून शस्त्रक्रियेचे सर्व आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली. कै. मधुसूदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण समितीच्या माध्यमातून गरजेची मदत त्वरित उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यात श्री आलेख खंडेलवाल यांनी विशेष आर्थिक मदत केली, तर डॉ. शाम गावंडे, डॉ. ओ.जी. मुंधडा, डॉ. शुभांगी मुंधडा, डॉ. अपूर्व मुंधडा, डॉ. फिरोज (वर्धा), गीताई हॉस्पिटलचे डॉ. मोहम्मद परवेज आणि हजरत बाबा ताजुद्दीन रोगी सेवा संस्थेचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर शाइस्ता परवीन यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी भावना व्यक्त करत म्हटलं, “ही एक दैवी कृपा आहे. मी आयुष्यभर सर्व देणगीदार, डॉक्टर आणि संस्थांची ऋणी राहीन.” त्यांनी पुढे आश्वासन दिलं की, “विसारूनी सर्व जाती-धर्म, मी डोळे दान करण्याचे काम करीन.”
हरिना फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी यांनी सांगितले की, “शाइस्ता परवीनप्रमाणे अनेक रुग्णांची दृष्टी वाचवण्यासाठी संस्था नेहमीच तत्पर राहील.” देणगीदार श्री आलेख खंडेलवाल यांनी देखील समाजसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
नेत्र प्रत्यारोपण समितीचे संयोजक मनीष सावला आणि हरिना फाउंडेशनचे सचिव राजेंद्र वर्मा यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
या सेवाकार्यात चंद्रकांत पोपट (कार्याध्यक्ष), रामप्रकाश गिल्डा (उपाध्यक्ष), नेत्रदान समन्वयक शरद कासट, कंवारीलाल ओस्तवाल, सुलताना परवीन, नियाज अहमद मन्सूरी, विजयकांतजी चवरेकर, मोहम्मद कामिल आदींचा सक्रिय सहभाग होता.
हरिना फाउंडेशनचा हा प्रकल्प “डोळ्यांना नवदृष्टी” देणारा ठरला आहे आणि समाजातील गरजूंसाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.



