Latest Newsmelghat

मेळघाटच्या हरीसाल जंगलात वाघाचा उच्छाद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

धारणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरीसाल जंगल परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच झालेल्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन जनावरेही फस्त करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर धारणी तालुक्यातील नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चिखली गावाजवळ माणसावर हल्ला
हरीसालजवळील चिखली गावात एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. ही घटना घडून काहीच दिवस झाले असताना परिसरात आणखी दोन जनावरांवर वाघाचा हल्ला झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धारणी ते परतवाडा रोडवर वारंवार वाघांचे दर्शन
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, धारणी ते परतवाडा मार्गावर वाघांचा वावर दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस सातत्याने पाहायला मिळत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीती आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली
गुगामल-आकोट वन्यजीव विभाग आणि चिकना वन परिक्षेत्रात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नुकत्याच बुद्ध पौर्णिमेला झालेल्या वन्य प्राणी गणनेतही गोष्ट अधोरेखित झाली आहे. मात्र, वाघांचा मानवी वस्त्यांकडे वाढता वावर ही गंभीर बाब आहे.

सायंकाळी सहानंतर गावांमध्ये शुकशुकाट
वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळी सहा नंतर संपूर्ण भागात शुकशुकाट पसरतो. नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. शाळकरी मुलांचे शिक्षण, शेतमजुरांचे काम आणि दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
धारणी व हरीसाल परिसरातील नागरिकांनी वन विभागाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. वनविभागाने पिंजरा लावणे, गस्ती वाढवणे, आणि ट्रॅकिंग टीम सक्रिय करणे या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात अशी मागणी आहे.

प्रतिनिधी : नितेश किल्लेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button