Latest NewsParbhani

‘विकसित कृषी संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

परभणी : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषी संकल्प अभियानाचे’ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, परभरणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषी पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरीता केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, पुणे येथील कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे (भाप्रसे), पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि, पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषी क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजार पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात हे अभियान कृषी विभाग आणि 50 कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषी विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले असून यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले आहेत. याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button