citynewsMaharashtraNagpur

समाजाला हितेश बनसोड यांच्यासारख्या शेकडो तरुण समाजसेवकांची गरज – डॉ. लोहित मतानी

रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी निस्वार्थ सेवाकार्य आवश्यक; सावनेर येथे राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम, हितेश बनसोड यांचा सन्मान

सावनेर | प्रतिनिधी

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांचे प्राण वाचविण्यासाठी हितेश बनसोड यांच्यासारख्या निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करणाऱ्या एका नव्हे, तर शेकडो तरुण समाजसेवकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे महामार्ग पोलीस अधीक्षक डॉ. लोहित मतानी (IPS) यांनी केले. सावनेर येथील स्वर्गीय अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणादरम्यान ते बोलत होते.

रस्ते सुरक्षा ही केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगत डॉ. मतानी यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ‘मेरा भारत’ पोर्टलशी जोडले जावे आणि आपल्या कुटुंबापासूनच सुरक्षित वाहतुकीची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. कुटुंबातील सदस्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट, तर चारचाकी चालवताना सीटबेल्ट वापरण्यास प्रवृत्त करावे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना रोखावे, वेगमर्यादेचे पालन करण्यास सांगावे तसेच चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि धोकादायक ओव्हरटेक टाळण्याबाबत जागरूक करावे, असेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक वाहनचालकाने या नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघातांमध्ये सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घट घडवून अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक तथा ‘मृत्युंजय दूत’ हितेश बनसोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी केलेल्या कार्याचे डॉ. मतानी यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘सड़क सुरक्षा मित्र’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने महामार्ग पोलीस केंद्र, हेटी (पाटणसावंगी) यांच्या वतीने ‘सड़क सुरक्षा मित्र’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालणे, तरुण पिढीमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जिल्हास्तरावर स्वयंसेवक तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या सत्रात कर्नल संजीव शर्मा आणि रणजीत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देतानाच ‘राहवीर’ आणि ‘पीएम राहत’ यांसारख्या शासकीय योजनांची माहिती दिली. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

कार्यक्रमात दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर, चारचाकीमध्ये सीटबेल्ट लावणे, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, वाहतूक चिन्हे आणि सिग्नल यंत्रणेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांना ‘गुड समॅरिटन’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी महामार्ग पोलीस विभागाच्या उपअधीक्षक सरिता मेश्राम, महामार्ग पोलीस ठाणे पाटणसावंगीचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कोळी, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनोरकर, संजय गायकवाड, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन रवींद्र लोही यांनी केले. सत्राच्या अखेरीस उपस्थित प्रशिक्षणार्थींना स्वयंसेवक म्हणून जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह हितज्योती आधार फाउंडेशनचे आकाश यादव, नरेंद्र समदुरकर, अभिषेक कोठाडे, राजेश सिंदेवार आदींनी परिश्रम घेतले.

रस्ते अपघात रोखण्यासाठी केवळ नियमांची माहिती असून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने जबाबदार वाहनचालक आणि मदतगार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button