citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

ई-रिक्षा चोरीचा गुन्हा उघड; ५० हजारांची रिक्षा हस्तगत, कळमणा पोलिसांची कारवाई

दारूच्या नशेत भाड्याच्या रिक्षाचा अपघात; मालकाच्या भीतीने दुसरी ई-रिक्षा चोरल्याची आरोपीची कबुली, ३६ वर्षीय आरोपीला अटक

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर शहरातील कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या ई-रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अल्पावधीत छडा लावला आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीस गेलेली ५० हजार रुपये किमतीची ई-रिक्षा हस्तगत केली असून, याप्रकरणी रामेश्वर विठ्ठल निमजे (वय ३६, रा. कळमणा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मो. नईम मो. सलीम (रा. जलील लेआऊट, नागपूर) हे रात्रीच्या सुमारास कामानिमित्त वांजरा येथील मुक्तार मशिदीजवळ गेले होते. यावेळी त्यांनी आपली ई-रिक्षा (क्रमांक एमएच ४९ सीएफ ६५०२) रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र, काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना रिक्षा जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने रिक्षा चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी कळमणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमणा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरीच्या ई-रिक्षेचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपासातून ही रिक्षा कामना नगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून रिक्षा चालकाला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रामेश्वर विठ्ठल निमजे असल्याचे सांगितले. मात्र, ई-रिक्षाच्या मालकीसंबंधी कागदपत्रे मागितली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर फिर्यादीकडून रिक्षेची खात्री करून पंचांसमक्ष ५० हजार रुपये किमतीची ई-रिक्षा पोलिसांनी जप्त केली.

दारूच्या नशेत अपघात; मालकाच्या भीतीने केली रिक्षाची चोरी

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक कारण सांगितले. आरोपी स्वतः भाडेतत्त्वावर ई-रिक्षा चालवत होता. दारूच्या नशेत असताना त्याच्याकडून भाड्याच्या ई-रिक्षाचा अपघात झाला होता. यामुळे रिक्षाचा मालक आपल्यावर रागावेल आणि उदरनिर्वाहासाठी दुसरे वाहन उपलब्ध राहणार नाही, या भीतीतून त्याने दुसऱ्याची ई-रिक्षा चोरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याच्या कडेला उभी असलेली फिर्यादीची ई-रिक्षा वायर जोडून सुरू केली आणि तेथून पळवून नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील चोरीची ई-रिक्षा हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमणा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांनी ही कारवाई केली. अल्पावधीत चोरीचा गुन्हा उघडकीस आणून वाहन हस्तगत केल्याने कळमणा पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button